गंगापूर - वैजापूर वरखेड फाट्याजवळ अपघात; एक ठार, एक गंभीर

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर वैजापूर महामार्गावर वरखेड फाट्याजवळ उसाचा ट्रॅक्टर आणि मोटारसायकलचा अपघात होऊन एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावातील वराच्या लग्नावरून परत येत असताना ही घटना घडली. 

महालगावच्या दिशेने उसाचा ट्रॅक्टर जात असताना मोटरसायकलला जोरदार धडक बसली. या अपघातात राज विजय पाळंदे (३०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मित्र राजू बाबासाहेब उबाळे (२५) हा गंभीर जखमी झाला. जखमीला तातडीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.

ट्रॅक्टर चालक फरार शिल्लेगाव पोलिसांचा शोध अपघातानंतर उसाचा ट्रॅक्टर चालक गाडी टाकून पसार झाला असून शिल्लेगाव पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोजने व पोलीस कर्मचारी वी आर जाधव हे तपास करत आहे. महालगाव परिसरातून कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत आहे. 

रात्रीच्या वेळेस लाईट, रिफ्लेक्टर नसणे ओव्हरलोड वाहतूक वेग नियंत्रणाचा अभाव वाहनावर क्रमांक प्लेट नसेल, तर झाकून ठेवणे यांसारखे प्रकार सर्रास दिसून येतात. यामुळे गंगापूरवैजापूर रोडवर अपघातांची मालिका वाढत असून निर्दोष नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.

नियमबद्ध वाहतूक सुनिश्चित करणे अत्यावश्यक वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस आणि कारखाना प्रशासन यांनी समन्वयाने नियमबद्ध वाहतूक सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा ऊसवाहतुकीच्या नावाखाली सुरू असलेला बेजबाबदारपणा कधीही मोठ्या दुर्घटनेचे रूप घेऊ शकतो, अशी स्थानिक नागरिकांची भावना आहे.